जर्मनीत भारताच्या राजदूत असणाऱ्या सुजाता सिंग यांची भारताच्या परराष्ट्र सचिवपदी निवड झाली आहे. रंजन मथाई यांच्याजागी आता त्यांची निवड निश्चित झाली आहे. ५९ वर्षीय सुजाता सिंग या १९७६च्या भारतीय आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. विदेश सचिवपदासाठी सुजाता सिंग यांच्यासह सध्या चीनमध्ये राजदूत असणारे एस. जयशंकर हेदेखील स्पर्धेत होते. जयशंकर हे सुजाता सिंग यांच्यानंतरच्या बॅचचे अधिकारी आहेत.
सुजाता सिंग या पुढच्या वर्षी जुलैमधून निवृत्त होणार होत्या, मात्र आता त्यांना आणखी दोन वर्षांचा कालावधी वाढवून मिळाला आहे. सध्याचे परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांच्या जागेवर त्यांची नेमणूक होणार आहे. मथाई ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.   चोकीला अय्यर आणि निरुपमा राव यांच्यानंतर सुजाता सिंग या परराष्ट्र सचिवपदाचा भार सांभाळणाऱ्या तिसऱ्या महिला ठरणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या निकटचे समजले माजी आयबी प्रमुख टी. व्ही. राजेश्वर यांच्या त्या कन्या आहेत. तसेच यावर्षी एप्रिलमध्ये निवृत्त झालेल्या सचिव (पूर्व क्षेत्र) संजय सिंग यांच्या त्या पत्नी आहेत.