संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. खासदारांच्या गोंधळामुळे लोकसभा २ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून संसदेच कामकाजं होऊ शकलेलं नाही. आठ दिवसांमध्ये फक्त १६ मिनिटे संसदेच कामकाज होऊ शकलेलं आहे. बुधवारी खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन नाराज झालेल्या पहायला मिळालं. सरकार आणि विरोधी पक्ष दोघेही चर्चेसाठी तयार असताना काही खासदारांच्या गदारोळामुळे आम्ही सभागृह चालवू शकत नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

‘तुम्ही प्रत्येकाचा वेळ वाया घालवत आहात. सभागृह चालावं अशी सर्व खासदारांची इच्छा आहे. अन्यथा मला अनिश्चित काळासाठी सभागृह स्थगित करावं लागेल’, असं सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. सतत सुरु असलेल्या गदारोळामुळे अखेर त्यांनी २ एप्रिलपर्यंत सभागृह स्थगित केलं. टीडीपी आणि वायएसआरसीपीने संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. १६ मार्चपासून आंध्रप्रदेशातील खासदार वारंवार निदर्शन करत आहेत.

आंध्रप्रदेशातील खासदार राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहेत. टीडीपी आणि वायएसआरसीपीचे खासदार सतत मोदी सरकारविरोधात निदर्शन करत आहेत. मंगळवारी टीडीपीच्या खासदारांनी निदर्शन बंद केलं होतं, मात्र बुधवारी अण्णाद्रुमूकच्या खासदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सुमित्रा महाजन यांना लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं.