प्रसिद्ध गायक रेमो फर्नाडिस व त्यांचा मुलगा जोनाह यांना गोवा पोलिसांनी एका अपघात प्रकरणी समन्स पाठवले आहे. रेमो फर्नाडिस यांच्या मुलाच्या गाडीने एका मुलीला धडक दिली होती त्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली असून, त्याच्याआधारे पोलिसांनी दुसऱ्यांदा फर्नाडिस यांना समन्स बजावले आहे.
युरोप दौऱ्यामुळे फर्नाडिस सोमवारी अगासेम पोलिस स्थानकात हजेरी लावू शकले नाहीत, त्यामुळे पुन्हा समन्स जारी करण्यात आले होते. आता त्यांना २३ डिसेंबरला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे असे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले. त्यांचा मुलगा जोनाह यालाही सकाळी समन्स पाठवण्यात आले व त्याला आज सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सिसोलिम येथील निवासस्थानी ते नसल्याने दारावरच शनिवारी समन्स चिकटवले. रेमो फर्नाडिस यांनी सांगितले, की मी उद्या पोलिसांपुढे उपस्थित राहू शकत नाही, कारण तातडीच्या कामासाठी युरोपला जायचे आहे. रेमो फर्नाडिस यांनी अपघातातील जखमी मुलीला गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी धमकावले होते. पोलिस तक्रारीत असे म्हटले आहे, की रेमो यांनी वॉर्डमध्ये जाऊन या मुलीला उपचार घेत असताना धमकावले. रेमो यांच्या मुलाने गाडी चालवत असताना तिला धडक दिली होती. पोलिसांनी या मुलीचा व महाराष्ट्रातील मालवण शहरात राहणाऱ्या तिच्या मोठय़ा बहिणीचा जबाब नोंदवला होता.
२ डिसेंबर रोजी जुन्या गोव्यात ही मुलगी चालत जात असताना फर्नाडिस यांचा मुलगा जोनाह याने तिला मोटारीची धडक दिली. तो बेदरकारपणे मोटार चालवत होता.