पत्नी सुनंदा पुष्करच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणी वाढू शकतात. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे किंवा हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्यात यावा अशी विनंती दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिल्ली न्यायालयाला केली.

आरोप निश्चित करण्यासंबंधी युक्तीवाद सुरु असताना वरिष्ठ सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर सध्या जामिनावर बाहेर आहेत. कलम ४९८ अ, ३०६ ( आत्महत्येला प्रवृत्त करणे) किंवा ३०२ (हत्या) हे आरोप थरुर यांच्याविरोधात निश्चित करावेत अशी मागणी तपास यंत्रणेने विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्याकडे केली.

थरुर यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एका व्यक्तीची जबानी यावेळी सादर करण्यात आली. ती व्यक्ती सुद्धा या प्रकरणात साक्षीदार आहे. कॅटी नावाची मुलगी आणि ब्लॅकबेरी मेसेजवरुन शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात वाद झाला होता. मृत्यूच्या आधी सुनंदा पुष्कर यांना आयपीएलच्या मुद्दावर पत्रकार परिषद घ्यायची होती असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. २०१४ साली दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या.