सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी करण्यात आलेले  काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनास दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला. शशी थरुर हे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये, असा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलैला होणार  आहे.

जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी थरुर यांच्यावर कलम ४९८ अ (पतीकडून महिलेचा क्रूर छळ) आणि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थरुर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.

दिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील अतूल श्रीवास्तव यांनी बाजू मांडली. शशी थरुर हे प्रभावशाली व्यक्ती असून ते तपासात अडथळे आणू शकतात. ते वारंवार परदेश दौऱ्यांवर जातात आणि ते परदेशात स्थायिक देखील होऊ शकतात. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार नारायण सिंह आणि बजरंगी हे दोन नोकर अजूनही थरुर यांच्या घरीच काम करतात. साक्ष फिरवण्यासाठी थरुर त्यांच्यावरही दबाव टाकू शकतात, असे सरकारी वकिलांनी नमूद केले.

थरुर यांच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. पोलिसांच्या दाव्यात विरोधाभास आहे. थरुर यांनी तपासात सहकार्य केल्याचे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते. म्हणूनच थरुर यांना अटक करण्यात आली नव्हती. आता थरुर यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, असे सिब्बल आणि सिंघवी यांनी सांगितले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी निकाल राखून ठेवला. ७ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून या दिवशी थरुर यांनी न्यायालयात उपस्थित राहावे यासाठी समन्स पाठवण्यात आले.