केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालामध्ये काढण्यात आला आहे. सुनंदा पुष्कर गेल्या शुक्रवारी रात्री दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील ३४५ क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती.
सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहाचे शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या शरीरावर काही जखमा आढळल्या होत्या. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि आकस्मिक असल्याचे तपास यंत्रणेतील सूत्रांनी स्पष्ट केले होते. औषधांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर शवविच्छेदन अहवालात विषबाधेमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
शशी थरूर यांच्या घरी रंगकाम सुरू असल्याने हे दाम्पत्य या हॉटेलात राहात होते. काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनासाठी थरूर दिवसभर उपस्थित होते. रात्री ते हॉटेलात परतले, तेव्हा खोली आतून बंद होती. थरूर यांनी खोलीत प्रवेश केला, तेव्हा सुनंदा झोपल्याचे त्यांना वाटले. मात्र काही क्षणांतच त्या मृत झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला.