आपली पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यू प्रकरणाबद्दल पोलीस करत असलेला तपास कुठल्याही राजकीय दबावाशिवाय आणि पूर्वनियोजित निष्कर्षांविना व्यावसायिकरीत्या व्हायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली आहे.
शशी थरूर हे गेले दोन आठवडे गुरुवायूर येथे आयुर्वेद उपचार घेत होते. त्यांच्या पत्नीच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना थरूर यांनी ‘निष्पक्ष’ तपासात आपण पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
आतापर्यंत या प्रकरणाचा तपास ज्या रीतीने झाला आहे, त्याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न आणि चिंता असून त्याबद्दल मी कालच दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. ते याबाबत तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करतील अशी मी आशा करतो, असे थरूर म्हणाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचे जे काही प्रश्न असतील, त्यांची उत्तरे देण्याची संधी लवकरात लवकर मिळण्याची मी वाट पाहात असल्याचे थरूर यांनी पत्रात म्हटले आहे. सुनंदाच्या मृत्यूमध्ये काही दगाफटका झाला असल्याचे आमच्या कुटुंबाला वाटत नसल्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाचा आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण संपावे आणि सुनंदासह सर्वाना न्याय मिळावा असे मला वाटते. मात्र या प्रकरणाच्या संदर्भात येणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे अनावश्यक वाद, चुकीची माहिती आणि काही वेळा साफ खोटय़ा आहेत, असे थरूर म्हणाले.