काँग्रेसचे नेते शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले गेलेले नाही. अशात दिल्लीचे माजी पोलीस उपायुक्त बी.एस. जयस्वाल यांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे की सुनंदा पुष्कर यांची हत्या करण्यात आली. आपल्या अहवालात त्यांनी एम्स रूग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचा दाखला दिला आहे. तसेच सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नसल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्य्याच्या खुणा, सिरींजच्या खुणा आणि झटापट झाल्याने जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या होत्या. या खुणांमुळे त्यांची हत्याच झाली असावी असे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. ‘टाइम्स नाऊ’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हा अहवाल जयस्वाल यांनी माजी सह पोलीस आयुक्तांना दिला होता असेही या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.

१७ जानेवारी २०१४ ला दिल्लीतील हॉटेल लीला पॅलेस या ठिकाणी एका खोलीत सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू होऊन चार वर्षे उलटली तरीही पोलिसांना या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही. तसेच याप्रकरणी आत्तापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही किंवा कोणतीही ठोस कारवाईही झालेली नाही. अशात हा अहवाल समोर आला आहे त्यामुळे काँग्रेस नेते शशि थरूर यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शशि थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यानंतर चार वर्षांनी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये आढळून आला होता. या संदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर मागील वर्षी जुलै महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचीही मदत घेतली होती. आता एका सिक्रेट नोटवरून त्यांचा मृत्यू ही हत्याच होती हे समोर येते आहे.