केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी झटपट चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले. थरूर यांनी आपल्याला तसे पत्र लिहून या प्रकरणी त्वरेने चौकशी करण्याची विनंती केली आहे. संबंधित व्यक्तीसमवेत आपले बोलणे झाले असून ते त्यांचे काम करीत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात आपले पूर्ण सहकार्य राहील, असे पत्र शशी थरूर यांनी रविवारी िशदे यांना पाठविले होते. या प्रकरणी माध्यमांमध्ये जे काही छापून आले आहे, ते भयंकर होते, असे थरूर यांनी म्हटले होते. सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी वेगाने चौकशी करावी, जेणेकरून शक्य तितक्या लवकर सत्य बाहेर येईल, अशीही विनंती थरूर यांनी शिंदे यांना केली आहे.