सुंदरबनमधील पाण्याची पातळी धोकादायक प्रमाणात वाढत असून तेथील अधिवास धोक्यात आला आहे, असा धोक्याचा इशारा जागतिक बँकेने एका अहवालात दिला आहे. सुंदरबन भागात सागराची जलपातळी दरवर्षी ३ ते ८ मि.मी. वाढण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली असून नैसर्गिक व मानववंशीय कारणांनी जमिनीचा झालेला विनाश हे त्याचे कारण आहे.
बिल्डिंग रिसालियन्स फॉर सस्टेनेबेल डेव्हलपमेंट ऑफ सुंदरबन्स- स्ट्रॅटेजी रिपोर्ट शीर्षकाच्या या अहवालात म्हटले आहे की, दक्षिणेकडील किनारी भागाचा विस्तार होत असून भूगर्भशास्त्रीय प्रक्रियांच्या दृष्टिकोनातून हे बदल हानिकारक आहेत.
२००४ मध्ये आलेल्या सुनामीसारख्या लाटा व त्यानंतरचे भूकंपाचे धक्के यामुळे काही दिवसात जमिनीची पातळी काही मीटरने बदलू शकते. पण जमीन पाण्याखाली जाण्याचा परिणाम जास्त जाणवत असून घोरमारा बंदर पूर्ण पाण्याखाली गेले आहे.
आजूबाजूची दोन बंदरे वस्तीस योग्य राहिली नाहीत, ती भरतीच्या पाण्याखाली गेली आहेत. जागतिक बँकेचे सल्लागार संजय गुप्ता यांनी सांगितले की, सुंदरबन भागाची स्थिती चिंताजनक असून त्याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. माती व गोडय़ा पाण्याचे क्षारीकरण होत असून जमीन व पाणी खारट बनत आहे.
नैसर्गिक घटनांमुळे किनारे नष्ट होत आहेत. सपाट जमीन पाहता तेथे पाण्याची पातळी ४५ से.मी. ने वाढून भारत व बांगलादेशातील सुंदरबनचा ७५ टक्के भाग नष्ट होण्याची भीती आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अनेक गंभीर परिणाम होतील असा इशारा देण्यात आला आहे.
पीटीआय, बाली बेटे, सुंदरबन