भारतीय सागरात उत्तरेकडे चीनचे वाढते अस्तित्व हे भारतासाठी आव्हान आहे, परंतु या क्षेत्रात तैनात करण्यात आलेल्या चीनच्या नौका आणि पाणबुडय़ांवर भारताचे बारकाईने लक्ष आहे, असे नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी येथे स्पष्ट केले.

अ‍ॅडमिरल लान्बा हे चार दिवसांच्या ब्रिटन भेटीवर आले आहेत. जहाजबांधणी क्षेत्रात चीनने जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी गुंतवणूक कोणत्याही देशाने केलेली नाही, असेही ते म्हणाले. भारतीय महासागरामध्ये चीनच्या नौदलाचे वाढते अस्तित्व ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. चीनचा जपानसमवेत पूर्व चीन सागरावरून वाद आहे, दक्षिण चीन सागरावर ९० टक्के दावा चीनने केला असून तेथे व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवाननेही प्रतिदावे केले आहेत.

चीनने जहाजबांधणी क्षेत्रात जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी कोणत्याही देशाने केलेली नाही, हे आव्हान आहे, त्यांचे अस्तित्व आणि तैनात करण्यात आलेल्या नौका आणि पाणबुडय़ा यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे, असेही नौदलप्रमुख म्हणाले.