24 November 2020

News Flash

श्रीवर्धन, अलिबागने सुनील तटकरेंना तारले

दापोली, महाड, गुहागर आणि पेण या चार विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मताधिक्य मिळाले.

सुनील तटकरे

अनंत गीते यांना अकार्यक्षमता भोवली

हर्षद कशाळकर, अलिबाग

श्रीवर्धन मतदारसंघातील जोरदार मुसंडी आणि अलिबागमधील मताधिक्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. अनंत गीते यांना मतदारसंघातील अकार्यक्षमता आणि नाराजी भोवली.

रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ मतांनी पराभव झाला. सलग सातव्यांदा निवडून येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. दापोली, महाड, गुहागर आणि पेण या चार विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मताधिक्य मिळाले. पण श्रीवर्धन, अलिबाग मतदारसंघात तटकरेंनी घेतलेली आघाडी निर्णायक ठरली. श्रीवर्धनमधून तटकरे यांना ३७ हजार ७४४, तर अलिबागमधून १८ हजार २६४ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीनेच त्यांना तारले.

तटकरेंसाठी शेकाप आणि काँग्रेसची साथ मोलाची ठरली. महाड, दोपोली, गुहागर या विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे माताधिक्य रोखण्यात ते यशस्वी झाले. कुणबी समाज आणि गीते हे समीकरण मोडीत काढण्यात तटकरेंना यश आले.

हा मतदारसंघ कुठल्याही लाटेवर स्वार होत नाही, हे पुन्हा  दिसले. गीते यांना नाराजीचा फटका बसला. मतदारसंघातील अकार्यक्षमता त्यांना भोवली. केंद्रात मंत्री असूनही मतदारसंघात मोठे प्रकल्प आणण्यात ते अपयशी ठरले. पक्षांतर्गत नाराजीचाही फटका बसला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेना गाफील राहिली. नाविद अंतुलेंच्या प्रवेशाचाही फारसा परिणाम झाला नाही. शिवसेनेचा ‘सोशल इंजिनीअिरग’चा प्रयोग फसला.

उमेदवार नामसाधम्र्य खेळीही फसली

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत शिवसेनेने दोन सुनील तटकरे आणि एक सुभाष पाटील नामक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी केली होती. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात काही प्रमाणात ते यशस्वी झाले, पण निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाला नाही. अपक्ष उमेदवार सुभाष पाटील यांना १२ हजार २६५ मते पडली, सुनील सखाराम तटकरे यांना ९ हजार ७५२ मते मिळाली. सुनील पांडुरंग तटकरे यांनी ४ हजार १२६ मते घेतली.

वंचित आघाडीला २३ हजार १९६ मते

राज्यभरात वंचित आघाडीच्या उमेदवारांचा थेट फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांना बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपचे उमेदवार निवडून आले. रायगडमध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्यात वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना यश आले नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांना त्याचा फायदा झाला. सुमन कोळी यांना २३ हजार १९६ मते मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 3:48 am

Web Title: sunil tatkare of ncp wins raigad election results 2019
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आता वंचित आघाडीचेही आव्हान
2 मोदींच्या विजयाचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत संमिश्र पडसाद
3 सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी
Just Now!
X