अभिनेता सनी देओल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सनी देओलचे वडील धर्मेंद्र हे भाजपाचे माजी खासदार आहेत. जसे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते, तसा मी आज मोदींसोबत आहे, असे उद्गार त्यांनी पक्षप्रवेशावेळी काढले.

‘माझे वडील माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते. आज मी नरेंद्र मोदींसोबत आहे. पुढील पाच वर्षे तेच पंतप्रधानपदी राहावेत, अशी माझी इच्छा आहे. युवकांना मोदींची गरज आहे. मी या कुटुंबात सहभागी झालो आहे. जे-जे शक्य आहे ते नक्कीच करून दाखवणार आहे. मी फक्त बोलणार नाही, तर ते मी माझ्या कामातून दाखवून देईन’ अशी प्रतिक्रिया सनी देओलनं भाजप प्रवेशानंतर दिली.

सनी देओलनं गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सनी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.

दरम्यान, गुरूदासपूर मतदारसंघावर दोन दशकांपर्यंत भाजपाचे वर्चस्व आहे. या जागेवरून विनोद खन्नादेखील भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. विनोद खन्ना यांनी 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता. 27 एप्रिल 2017 रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांना रेकॉर्डब्रेक मतं मिळाली होती.