केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, सध्या या आंदोलनाविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. त्याचबरोबर काही अफवादेखील पसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी ट्विट करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. काही जण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं आहे.
“माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, या आंदोलनाचा मुद्दा हा शेतकरी आणि सरकारमधील आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये. कारण आपापसात चर्चा करुन या मुद्द्यावर तोडगा निघणार नाही. मला हेदेखील चांगलंच माहित आहे की काही जण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून या आंदोलनामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येशी काहीही घेणंदेणं नाहीये. ते केवळ आणि केवळ स्वत:चा विचार करत आहेत”, असं सनी देओल म्हणाले.
आणखी वाचा- दिलजीतच्या ‘त्या’ ट्विटवर प्रियांका चोप्रा झाली व्यक्त, ट्विट करत म्हणाली…
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020
पुढे ते म्हणतात, “दीप सिद्धू, जे निवडणुकीच्या वेळी सातत्याने माझ्यासोबत होते. पण आता ते माझ्यासोबत नाहीत. त्यामुळे ते जे काही वक्तव्य करत आहेत किंवा जी कृती करत आहेत, ते स्वत: त्यांच्या मनानुसार करत आहेत. यात माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. ते जे काही करतायेत त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी आणि माझा पक्ष शेतकऱ्यांसोबत आहोत आणि कायम मी त्यांच्या पाठिशी असेन. आपल्या सरकाराने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, सरकार त्यांच्याशी नीट चर्चा करुन योग्य तो तोडगा काढतील”.
वाचा : ‘शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका’; दिलजीतचं जनतेला आवाहन
दरम्यान, सनी देओल यांनी शेतकरी आंदोलनाविषयी पहिल्यांदाच हे ट्विट केलं आहे. यापूर्वी त्यांनी कोणतंही ट्विट किंवा वक्तव्य केलं नव्हतं. त्यामुळे शेतकरी आंदोलन सुरु झाल्यानंतर १० व्या दिवशी त्यांनी केलेलं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 9:39 am