• इतिहासातील दुसरी मोठी १९४२ अंशांची आपटी
  • एका दिवसांत गुंतवणूकदारांच्या ७ लाख कोटी मत्तेचा चुराडा

 

मुंबई : जगभरातून सुरू असलेल्या नकारात्मक घडामोडींच्या महापुराने आणखी एका ‘काळ्या सोमवार’चा क्रूर अनुभव भांडवली बाजार गुंतवणूकदारांना दिला. ऑगस्ट २०१५ नंतरची इतिहासातील दुसरी मोठी घसरंगुडी बाजाराच्या‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही निर्देशांकांनी अनुभवली. धुळवडीच्या एक दिवस आधीच झालेल्या धुळधाणीत, सेन्सेक्स १,९४१.६० अंश गमावून, ३५,६३४.९५ या पातळीवर, तर निफ्टी निर्देशांक ५३८ अंशांच्या नुकसानीसह दिवसाअखेरीस १०,४५१.४५ वर स्थिरावताना दिसला.

गत सप्ताहअखेरच्या म्हणजे शुक्रवारच्या मोठय़ा पडझडीनंतर, दोन्ही निर्देशांकांना प्रत्येकी ५ टक्क्यांचा दणका देणारी ही सलग दुसरी घसरगुंडी आहे. शुक्रवारच्या पडझडीला कारण ठरलेल्या, येस बँक संकटाच्या भीतीला बाजाराने मागे टाकले असल्याचे आढळून येत असून, सोमवारच्या व्यवहारात तर येस बँकेचा समभाग तब्बल ३१.५८ टक्क्यांनी उसळला. खनिज तेलावरून सुरू झालेले किंमत युद्ध आणि करोना विषाणूजन्य आजाराचे जगभरात वेगाने फैलावत असलेले थैमान हे आधीच कुंठितावस्थेला पोहचलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला महामंदीच्या कवेत लोटत आहे, अशी भीतीदायी भावना बाजाराची बनली आहे.

बाजारात घबराटीचा माहोल इतका प्रचंड होता की, १०,७४२ च्या पातळीवरून सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा निफ्टी निर्देशांक १०,२९४ अंशांपर्यंत अधेमधे न थांबता निरंतर घरंगळत गेला. सेन्सेक्सची दुपारी दीड सुमारास २,५०० अंशांपर्यंत घसरण दाखवणारी गाळण उडाल्याचे दिसून आले.

सेन्सेक्सचीही गटांगळी ३५ हजाराची वेसही मागे टाकते की काय असे दिसत असतानाच, उत्तरार्धात देशांतर्गत काही सकारात्मक बातम्यांच्या परिणामी त्यात काहीशी सुधारणा दिसून आली. तरी सोमवारच्या व्यवहारांना दुसऱ्या मोठी ऐतिहासिक घसरणीचा बट्टा टाळता आला नाही.शुक्रवारच्या सेन्सेक्सच्या ८९४ अंशांच्या गटांगळीने -भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची ३ लाख ८० हजार कोटींची संपत्ती होत्याचे नव्हती बनवली,

तर सोमवारच्या १९४२ अंशांच्या आपटीतून त्यांच्या आणखी सुमारे ७ लाख कोटींच्या सपत्तीचा चुराडा केला. निफ्टी निर्देशांकात सामील आघाडीच्या ५० समभागांपैकी ४६ समभाग घसरणीत राहिले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसारखा तगडा समभाग उणे १२.३ टक्के, तर ओएनजीसी उणे १५.८ टक्के यांचा घसरणीत अग्रक्रम राहिला.

बाजाराची घसरगुंडी कशामुळे?

  • दिवसांत इतक्या लोकांनी बळी जाण्याचे हे चीनबाहेरील सर्वाधिक प्रमाण आहे. युरोपातही या आजाराची मोठी दहशत असून, साथीच्या भीतीने इटलीतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची घरातच कोंडी आणि घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले गेले आहेत.
  • करोनाग्रस्त चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असून, जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्याचे त्या देशाची निर्यात १७ टक्क्यांनी गडगडल्याची आकडेवारी भयकारक आहे. उल्लेखनीय म्हणजे चीनची आयातही चार टक्क्यांनी रोडवली आहे.

बाजाराची घसरगुंडी कशामुळे?

तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना असलेल्या ‘ओपेक’ अंतर्गत खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती ठरवण्यावरून रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उभा दावा मांडला गेला. एकंदर घसरलेल्या मागणीला चालना देण्यासाठी सौदीने एकतर्फी निर्णय घेत किमती कमी केल्या. त्यापायी प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे सौदे हे किमतीत ३० टक्क्यांहून अधिक घसरणीसह सुरू झाले. तेलाच्या किमतीत एका दिवसात इतकी मोठी घसरण मागील तीन दशकांत पहिल्यांदाच दिसून आली.

बाजारात आलटून-पालटून ‘काळा शुक्रवार’ आणि ‘काळा सोमवार’ असे दणके देणारी पाशवी खेळी ही चालू वर्षांतील जानेवारीतील निफ्टी निर्देशांकाने १२,४३० हा सार्वकालिक उच्चांक दाखवल्यानंतर निरंतर सुरू आहे. अल्पावधीत त्या पातळीपासून निफ्टी १५.९ टक्के गडगडला आहे. पूर आल्याप्रमाणे नकारात्मक बातम्यांचा ओघ बाजारावर निरंतर आदळत असून, त्यापायी जगभरात सर्वच बाजारात पडझड सुरू आहे. परिणामी खनिज तेलाच्या किमती गडगडल्याच्या एरव्ही सकारात्मक बातमीचे स्वागत होण्याऐवजी पडझडक्रम सुरूच असलेला दिसतो. त्यामुळे बाजारावरील मंदीवाल्यांचा प्रभाव वाढलेला दिसून येत असून, घसरणीचा हा घाला यापुढेही सुरू राहण्याची भीती बळावली आहे. – श्रीकांत चौहान, विश्लेषक, कोटक सिक्युरिटीज आर्थिक मंदीच्या घट्ट पकडीचे भय

करोना विषाणूचे थैमान आणि दहशत सुरू असताना, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील जबर घसरण यातून जगावर आर्थिक महामंदीची पकड अधिकच घट्ट होत असल्याच्या भीतीने गुंतवणूकदाराच्या मनात घर केले आहे. त्या परिणामी जगभरातील प्रमुख भांडवली बाजारात सुरू असलेल्या घसरणीचेच साद-पडसाद आपल्याकडे उमटत आहेत. मुख्यत: विदेशी गुंतवणूकदार स्थानिक बाजारातून पाय काढून घेताना विक्री करीत आहे. जरी खनिज तेलाच्या किमती इतक्या विलक्षण पडणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वरदानच असले तरी बाजारावर निरंतर आदळत असलेल्या नकारात्मक बातम्यांचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, त्यामुळे घबराटीचे वातावरण सध्यापुरते तरी वरचढ ठरलेले दिसते.

—  विनोद नायर, विश्लेषक, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस