झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तेथील पोलिस अधीक्षकांसह पाच जण शहीद झाले. हल्ल्यामध्ये दोन पोलिस जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मे महिन्यात छत्तीसगढमधील बक्सर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यानंतरचा नक्षलवाद्यांचा हा मोठा हल्ला आहे.
डुमकामध्ये बैठकीसाठी पाकूरचे पोलिस अधीक्षक अमरजित बलिहार तिथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. याच हल्ल्यात अमरजित बलिहार यांच्यासह इतर पोलिस शहीद झाले. बलिहार हे २००३च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या गाडीचा चालक, तीन सुरक्षारक्षकही शहीद झाले. रांचीपासून ४०० किलोमीटरवर असलेल्या अमरपाच्या जंगलामध्ये ही घटना घडली.
बलिहार यांची गाडी जंगलातून जात असताना नक्षलवाद्यांनी तिथे स्फोट घडवून आणले आणि त्यानंतर गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.
(संग्रहित छायाचित्र)