जगातील सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेल्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भारताकडून गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. राजस्थानातील पोखरण येथील तळावरुन गुरुवारी पहाटे ही चाचणी पार पडली. कमी उंचीवर वेगाने उड्डाण घेणारे आणि रडारच्या टप्प्यातही ने येणारे क्षेपणास्त्र अशी ब्रह्मोसची ओळख आहे.


भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या जून २००१मध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मस्कवा नदी यांच्यावरुन याचे नाव ब्रह्मोस असे ठेवण्यात आले. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या गतीपेक्षा तीनपट अधिक आहे. २९० किमी पर्यंत मारा करु शकण्याची तर ३०० किग्रॅ वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोसला पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करण्यासाठीही वापरता येणे शक्य आहे. जमिनीखालील बंकर्स, कन्ट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरून उडणाऱ्या विमानांनाही क्षणात उध्वस्त करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

१२ फेब्रुवारी १९९८ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रशियाचे पहिले डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर एन. वी. मिखाईलॉव यांनी एका करारावर हस्ताक्षर केल्यानंतर ब्रह्मोसच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला होता. भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएम या संस्थांकडून हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.