पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या मोहिमेला आता सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचीही साथ लाभली आहे. यंदाच्याच वर्षी राजकारणात प्रवेश करणाऱ्या रजनीकांत यांनी मोदींच्या या मोहिमेचं समर्थन केलं आहे. या अनोख्या मोहिमेमुळे पैसा आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींची बचत होईल हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

एका कार्यक्रमात हजेरी लावली असता त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना अतिशय वेगळी असून, त्यामुळे पैसा आणि वेळेची पूर्णपणे बचत होईल तेव्हा सर्वच पक्षांनी या मोहिमेत सहभागी होत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

वाचा : लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

देशाच्या विकासाच्या मुद्द्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. त्यासोबतच शिक्षण व्यवस्थेविषयी वक्तव्य करत इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूच्या शिक्षण व्यवस्थेचं त्यांनी कौतुक केलं. दरम्यान, गेल्या काही काळापासून ‘वन नेशन, वन इलेक्शन’कडेच आघाडी सरकारचा जास्त कल दिसून येत आहे. संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांच्या ऐवजी देशात एकदाच निवडणूका व्हाव्यात असा त्यांचा मानस आहे. त्याकरता अनेकदा त्यांनी जनता आणि राजकीय पक्षांसमोर ही गोष्ट मांडल्याचं पाहायला मिळालं आहे.