अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडून अनेकांनी आपले जीव गमावल्याचं आपण ऐकलं असेलच. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातही घडली ज्यामुळे पाच वर्षांच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तरप्रदेशातल्या बरेलीमधल्या एका गावात चार्ज होणाऱ्या एका इलेक्ट्रिक रिक्षाच्या वायरचा स्पर्श झाल्याने एका मुलाला करंट लागला. करंट लागल्याने तळमळत असलेल्या या मुलाला नातेवाईकांनी त्वरित रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांनी त्याला मातीत पुरलं आणि घरगुती उपचार करु लागले. या प्रकारामुळे या चिमुरड्याने आपले प्राण सोडले.

आणखी वाचा- योगी सरकारच्या निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी

उत्तरप्रदेशातल्या बरेली भागातल्या गिरधरपूर या गावातली ही घटना आहे. अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या कचाट्यात सापडून या पाच वर्षांच्या लेकराचा हकनाक बळी गेला. आजतकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

तर घडलं असं बुधवारी दुपारी शीशगढमधल्या गिरधरपूर गावातले रहिवासी रिक्षाचालक भूपेंद्र यांची रिक्षा घराच्या दरवाज्याजवळ चार्ज होत होती. तेव्हाच त्यांचा पाच वर्षांचा मुलगा खेळत खेळत रिक्षापाशी आला. रिक्षाच्या चार्जिंगच्या वायर्स अशा प्रकारे निघाल्या की त्यांचा त्या मुलाला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा मोठा झटका बसला. त्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. काहीतरी करुन आसपासच्या लोकांनी त्याला या तारांपासून वेगळं केलं. एकमेकांच्या सल्ल्याने लोकांनी त्याला मातीमध्ये पुरलं आणि मनाला हवे तसे घरगुती उपचार करु लागले. एका तासामध्ये त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तेव्हा त्याला रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र तोवर या लेकराने आपले प्राण सोडले होते.