दिल्लीमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली, तर राजधानीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही त्याची झळ सोसावी लागेल. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना करण्यात येणारा पाण्याचा पुरवठा कमी करू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवी दिल्लीतील अलिशान भागात राहणाऱया अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा रागाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेमध्ये केलेल्या भाषणात केजरीवाल म्हणाले, दिल्लीला पाणीपुरवठा करण्याबाबत हरियाणाने दिलेल्या आश्वासनाचे पालन त्यांनी केले नाही. तर पाण्याची कमतरता जाणवू शकते. राष्ट्रपती, पंतप्रधान, दिल्लीतील रुग्णालये आणि विविध देशांचे दूतावास वगळता इतर सर्वांनाच पाणीकपातीची झळ सोसावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील केंद्र सरकारचे कॅबिनेट व राज्यमंत्री, दिल्ली सरकारचे मंत्री, स्वतः आपण आणि इतर सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना याचा फटका सहन करावाच लागेल. या सर्वांना पुरविण्यात येणाऱया पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकपूर्वी हरियाणा सरकार दिल्लीला पुरेसा पाणीपुरवठा करीत होते. मात्र, एक्झिट पोल्सनंतर त्यांनी पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे थांबविले. पाण्याच्या विषयावरून कोणीही राजकारण करू नये. त्यामुळे यंदा दिल्लीत पाण्याची कमतरता जाणवली तर केवळ गरिबांनाच त्याची झळ सोसावी लागणार नाही. माझ्यासह सर्व दिल्लीकरांना समान प्रमाणात त्याची झळ सहन करावीच लागेल, असे त्यांनी सांगितले.