दशकभरात देशभर केलेल्या हिंसक कारवायांनंतर सीपीआय(माओवादी)च्या केंद्रीय समितीने पक्षाच्या मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रांच्या सक्षमतेवर भाष्यकेले आहे. जनसामान्यांमधील पक्षाची विश्वासार्हता सातत्याने कमी झाल्याची व “शत्रूंनी आपल्या केंद्रीय शस्त्रनिर्मीती आणि पुरवठा विभागाचे, राजकीय आणि सैन्य गुप्तवार्ता विभागाचे मोठे नुकसान केले.” अशी नोंद सीपीआय(माओवादी)च्या केंद्रीय समितीने नोंदवली आहे.  
मध्यमवर्ग व बुध्दीवाद्यांमध्ये पक्षाचे काम कमी पडले आहे. देशभरामध्ये प्रभाव कमी झाल्यामुळे ‘चळवळ वाईट अवस्थेमधून जात आहे’ अशी नोंदकरून, मलकानगिरी आणि सुकमाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अपहरणामुळे चळवळीची मोठी ‘राजकीय हाणी’ झाल्याचे त्या नोंदीमध्ये म्हटले आहे.    
सीपीआय(माओवादी)च्या केंद्रीय समितीने २०१३ च्या सुरूवातीला मंजूरकेलेल्या ११ पानी ठरावामध्ये या नोंदी केल्या आहेत. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीमधील २० वरिष्ठ कार्यकर्त्यांना महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकार मंडळाचा प्रमुख सीपीआय(माओवादी)चा महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती आहे.  
माओवाद्यांच्या या ठरावाची प्रत ‘द इंडियन एक्स्प्रेस’कडे असून, २१ सप्टेंबरला सीपीआय(माओवादी) पक्षाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण होत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. २१ सप्टेंबर हा दिवस देशभर पक्षस्थापना दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात साजराकरण्याचे निर्देश या ठरावामध्ये देण्यात आले आहेत.
सीपीआय(माओवादी)च्या ११ पानी ठरावामध्ये “आपल्या चळवळीच्या देशभरातील सध्यस्थितीचे मुल्यमापन” या प्रकरणामध्ये ‘दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी’ पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून, या समितीला मिळणारा जनसामान्यांचा पाठिंबा कमी झाल्याचे म्हटले आहे. अभिजनवादी प्रथा पक्षामध्ये रूजत असून, पिपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी'(पीएलजीए)मधील भरती रोडावली असल्याचे देखील या ठरावामध्ये म्हटले आहे. माओवाद्यांनी प्रथमच त्यांच्या कमजोऱ्या जाहिर केल्या आहेत.