सुधारित नागरिकत्व कायद्यावरून तणाव; दिल्लीत दोन मेट्रो स्थानके बंद

ईशान्य दिल्लीत जाफराबाद येथे सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधक रविवारी आमने-सामने आले. दोन्ही गटांनी परस्परांवर दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला.

सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी जाफराबाद मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी रात्री महिलांसह ५०० जणांनी निदर्शने केली. त्यामुळे या स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करून तिथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यानंतर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी या कायद्याच्या पाठिंब्यासाठी रविवारी दुपारी मौजपूर येथे सभा बोलावली होती. त्यापाठोपाठ या कायद्याचे विरोधक तिथे जमले. या वेळी दोन गटांत धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगवला. सुरक्षेच्या कारणास्तव मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकाची प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली.  या कायद्याचे विरोधक दिल्लीत अशांतता निर्माण करीत असल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला.