अमेरिकेमध्ये २०१६ साली होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी अभियान सुरू केले आहे. हिलरींच्या परराष्ट्रमंत्रिपदाची मुदत १ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
अमेरिकेच्या फेडरल निवडणूक आयोगात ‘रेडी फॉर हिलरी’ या संघटनेने शुक्रवारी नोंदणी केली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापिका आणि हिलरींच्या कट्टर समर्थक एलिडा ब्लॅक या संघटनेच्या अध्यक्षा आहेत, अशी माहिती ‘सेंटर फॉर पब्लिक इंटेग्रेटी’ने दिली आहे.
अध्यक्ष ओबामा आणि हिलरी यांची समर्थक असलेली आमची संघटना हिलरींना अध्यक्ष होण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास सज्ज आहे. आमच्या संघटनेतर्फे  लवकरच संकेतस्थळ सुरू करणार असून, त्याच्या माध्यमातून तळागळातील कार्यकर्त्यांना हिलरींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे ब्लॅक यांनी सांगितले.
हिलरी समर्थकांचे संकेतस्थळ अद्याप सुरू झाले नसले, तरी ‘रेडी फॉर हिलरी’ असा ट्रेंड हिलरी समर्थकांनी ट्विटरवर सुरू केला असून, त्याला ५० हजारहून अधिक जणांनी समर्थन दिले आहे. तसेच याबाबतच्या फेसबुक व पेजलाही ३० हजारपेक्षा अधिक फेसबुककरांनी पसंती दिली आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी २००८च्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी बराक ओबामा यांना आव्हान दिले होते, मात्र पक्षांतर्गत निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी मागील चार वर्षे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रिपद भूषविले आहे.