अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या उत्पन्नावरील कराच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या बाजूने निकाल दिला. या संदर्भातील दाव्यांचे कामकाज पुन्हा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला मंजुरी दिली.
‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या उत्पन्नावरील कराच्या मुदद्यावरून प्राप्तिकर विभागाच्या दाव्यांविरोधात अमिताभ बच्चन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याला प्राप्तिकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाचा युक्तिवाद योग्य ठरवत अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातील दाव्याचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. २००१-०२ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या उत्पन्नावर अमिताभ बच्चन यांनी प्राप्तिकर विभागाला १.६६ कोटींचा कर देणे असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.
उच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकाल देताना अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील कलाकार असल्याने त्यांना प्राप्तिकरातून सवलत दिली होती. प्राप्तिकर विभागातील कलम ८० आरआर नुसार कलाकार म्हणून आपल्याला प्राप्तिकरातून सवलत देण्यात यावी, असा युक्तिवाद अमिताभ बच्चन यांनी केला होता. तो उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला होता.