१३ वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाने बुधवारी परवानगी दिली. १३ वर्षांची मुलगी ही ३१ आठवड्यांची गर्भवती होती. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील रुग्णालयात पीडितेचा गर्भपात होणार आहे.

मुंबईत राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांच्या मित्राने लैंगिक अत्याचार केला होता. लठ्ठपणावर उपचारासाठी मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. गर्भपाताच्या कायद्यानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यास परवानगी नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या आईवडिलांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने जे जे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीला गर्भवती मुलीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी जे जे रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील अहवालही सुप्रीम कोर्टात पाठवला होता.

बुधवारी सुप्रीम कोर्टात मुलीच्या याचिकेवर सुनावणी झाली. ३१ आठवड्यांची गर्भवती असल्याने मुलीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. जे जे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिलेला अहवाल विचारात घेऊन सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने पीडित मुलीच्या गर्भपाताला परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता मुलीला गर्भपातासाठी गुरुवारी रुग्णालयात दाखल केले जाणार असून, शुक्रवारी तिचा गर्भपात केला जाईल, असे समजते.
सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी दिली. यापूर्वी हरयाणातील १० वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या गर्भपातास सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली होती.