सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.व्ही. रविंद्रन या तपास पथकाचे नेतृत्त्व करतील. केरळमधील शफीन जहान याने एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांचा हा विवाह नामंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केरळ पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले होते.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शफीन जहान याने एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. लग्नानंतर या महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगत हा विवाह नामंजूर केला. हा देशातील स्त्रियांनी देण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. शफीन जहान हा आयसिस या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून त्याला हिंदू स्त्रियांचे धर्मांतर करण्याची कामगिरी सोपवण्यात आल्याचा आरोप आहे.