दिवाळी हा उत्सव दिव्यांचा, रांगोळीचा, फटाक्यांचा असतो… देशभरात हा सण उत्साहात साजरा होतो. मात्र राजधानी दिल्लीत लोकांना फटाके विकत घेता येणार नाहीत. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे फटाका विक्रीवर १ नोव्हेंबरपर्यंत बंदी कायम ठेवण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला वसुबारस असल्याने याच दिवसापासून दिवाळी सुरु होते. तर २१ ऑक्टोबरला दिवाळी संपणार आहे. मात्र या काळात दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

११ नोव्हेंबर २०१६ पासून फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. दिल्लीत आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटक्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. म्हणूनच २०१६ पासून फटाके विक्रीवर आणि ते वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून फटाके विक्री करता येणार आहे. मात्र त्याआधी हवेतील प्रदूषणाची चाचणी केली जाणार आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने यावर्षी १२ सप्टेंबरला यासंदर्भातले काही नियम शिथील केले होते. मात्र केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने फटाके विक्रीवर बंदी घालण्यास पाठिंबा दर्शवला. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवली. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्ये ५० लाख किलो फटाके उपलब्ध आहेत. मात्र दिवाळीचा विचार करता हे प्रमाण खूप जास्त आहे. ज्या परवानाधारक फटाका विक्रेत्यांकडे फटाके आहेत ते त्यांच्याकडचे फटाके १ नोव्हेंबरनंतर विकू शकतात किंवा दुसऱ्या राज्यात पाठवू शकतात, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. हवा प्रदूषणाचा अहवाल ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सादर करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. यासाठी प्रदूषण नियामक मंडळाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीकरांची यंदाची दिवाळी फटाकामुक्त असणार आहे.