दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर तिथे सुरू करण्यात आलेल्या सम-विषम योजनेला सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी कृतिशील पाठिंबा दिला. न्या. ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांचे सहकारी न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या गाडीतून सोमवारी न्यायालयात येऊन सम-विषम तारखेनुसार चारचाकी गाड्या रस्त्यावर आणण्याच्या योजनेला आपला पाठिंबा दर्शविला. वास्तविक सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना या योजनेच्या अंमलबजावणीतून वगळण्यात आले आहे. घटनात्मक पद असल्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना लागू नाही. तरीही प्रदूषणावर उपाय म्हणून त्यांनी स्वयंस्फूर्तीने सम-विषमला पाठिंबा दिला.
न्या. ठाकूर आणि न्या. सिकरी हे सर्वोच्च न्यायालय एकाच पीठात कार्यरत आहे. त्यांची निवासस्थानेही जवळ आहेत. त्यामुळे एक जानेवारीपासून दिल्लीमध्ये ही योजना लागू झाल्यावरच त्यांनी आपला वाहन प्रवासाचे नियोजन केले होते. न्या. ठाकूर यांच्याकडे असलेल्या मोटारीचा क्रमांक विषम आहे. तर न्या. सिकरी यांच्याकडे असलेल्या मोटारीचा क्रमांक सम आहे. हिवाळी सुटीमुळे एक तारखेला सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज बंद होते. त्यामुळे सोमवार सुटीनंतरचा पहिलाच दिवस. त्या दिवशी सम क्रमांक असलेल्या गाड्यांनाच रस्त्यावर येण्याची परवानगी असल्यामुळे न्या. सिकरी यांनी आपली गाडी काढली. ते न्या. ठाकूर यांना घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथून ते दोघे सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी ‘कारपूल’च्या माध्यमातून योजनेत सहभाग घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.