दिल्लीतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार व खलिस्तानी अतिरेकी देवींदर पाल सिंग भुल्लर याची फाशी रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. दयेच्या अर्जावर सरकारने विलंब केल्याच्या कारणास्तव तसेच त्याची प्रकृती बरी नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
सरन्यायाधीश सथशिवम यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांच्या पीठाने हा निकाल दिला असून, सरकारने दयेच्या याचिकेवर विलंब लावला तसेच गुन्हेगाराची वैद्यकीय स्थिती वाईट असल्याच्या कारणास्तव फाशी रद्द करून जन्मठेप देण्यात येत आहे. सरन्यायाधीश पी. सथशिवम यांच्या नेतृत्वाखालील पीठाने भुल्लर यांच्या दयेच्या अर्जावर सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही व त्याची वैद्यकीय स्थिती वाईट असल्याच्या कारणास्तव त्याची फाशी रद्द करून जन्मठेप दिली. न्या. आर. एम. लोढा. एच. एल. दत्तू व एस. जे. मुखोपाध्याय यांनी भुल्लर याची पत्नी नवनीत कौर हिच्या याचिकेवर हा निकाल दिला. आपल्या पतीची फाशी रद्द करण्याची विनंती विचारात घेण्यात यावी व अलीकडच्या काळात दयेच्या अर्जावर विलंब झाल्याने न्यायालयाने काही जणांची फाशी रद्दही केली आहे. भुल्लरच्या दयेच्या अर्जावर असाच विलंब झाला असून त्याची फाशी रद्द करावी.
केंद्राने २७ मार्चला न्यायालयाला असे सांगितले होते, की भुल्लरची फाशी रद्द करण्यात आमची काही हरकत नाही. ३१ जानेवारीला न्यायालयाने त्याच्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते. ‘ह्यूमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस’ या संस्थेत भुल्लर याच्यावर उपचार चालले होते त्या संस्थेकडून त्याच्या वैद्यकीय स्थितीबाबत अहवाल मागवण्यात आला होता. कच्च्या गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षा दयेच्या अर्जावर विलंब झाल्यास रद्द करण्यात येतील असा निकाल २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने भुल्लर याने २६ मार्च २००२ रोजी कनिष्ठ न्यायालयाने ऑगस्ट २००१ मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर केलेले अपील फेटाळले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने २००२ मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. डिसेंबर २००२ रोजी त्याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. भुल्लर याने १४ जानेवारी २००३ रोजी दयेची याचिका राष्ट्रपतींकडे सादर केली होती. राष्ट्रपतींनी दयेची याचिका १४ मे २०११ रोजी फेटाळली होती, पण सरकारने अंतिम निर्णय घेतला नव्हता. दयेच्या याचिकेवर विलंब झाल्याने वीरप्पन टोळीतील पंधरा जणांची फाशी न्यायालयाने जन्मठेपेत परिवíतत केली होती.

सप्टेंबर १९९३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्फोटात ९ ठार तर२५ जण जखमी झाले होते. त्यात युवक काँग्रेस अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांचाही जखमींत समावेश होता.