‘आधार’च्या डेटा सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. आधारची नोंदणी करताना केंद्रचालक ‘आधार’चा डेटा कॉपी करु शकतो. याशिवाय खासगी कंपन्यांनीही आधार सक्तीचा धडाका लावला असून त्या देखील ‘आधार’चा गैरवापर करु शकतात, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.

आधार सक्तीबाबत सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्या. चंद्रचूड म्हणाले, सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमधून अजूनही ‘आधार’चा डेटा सुरक्षित राहील हे सुनिश्चित झालेले नाही. या डेटाचा गैरवापर होऊ नये इतकेच आमचे म्हणणे आहे, असे न्यायमूर्तींनी सांगितले. नागरिकांच्या खासगी माहितीचा वापर व्यावसायिक कामासाठी केला जाऊ शकतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.

‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ला सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. ‘नागरिकांच्या माहितीचा गैरवापर होणार नाही, असे तुम्ही सांगता. पण आधार नोंदणीचे काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. या संस्था नोंदणी करताना केंद्रचालक ‘आधार’चा डेटा त्यांच्याकडे कॉपी करुन ठेवू शकतात, असे कोर्टाने नमूद केले.

‘यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी कोर्टात चार तास पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. ‘आधार’ डेटा सुरक्षित असून तो उघड होणार नाही, याची शाश्वती त्यांनी दिली. यानंतर कोर्टाने दोन शंका उपस्थित केला. यात नोंदणी करताना खासगी संस्थाचा सहभाग आणि खासगी कंपन्यांनीही सेवेसाठी केलेली आधार सक्ती असे दोन मुद्दे कोर्टाने मांडले. या दोन्ही ठिकाणी खासगी माहितीचा गैरवापर शक्य आहे, असे कोर्टाने सांगितले. आधारमुळे सरकारी योजनांचा, सवलतींचा लाभ घेणाऱ्या व्यक्तिंना फायदा होईल, असा दावा पांडे यांनी वारंवार केला.