न्यायपालिकेतील सर्वोच्च वादावर पडदा टाकण्यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मंगळवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्या. चेलमेश्वर आणि अन्य तीन न्यायाधीशांची भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे ही बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टातील न्या. ए.के. सिकरी यांच्यासह आणखी दोन न्यायाधीश या प्रसंगी उपस्थित होते.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे महत्त्वाची प्रकरणे सुनावणीसाठी स्वत:कडे ठेवतात, किंवा त्यांच्या मर्जीतील न्यायाधीशांना देतात, असा आरोप न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी केला होता. न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेने देशातील सर्वोच्च न्यायपालिका हादरली होती. वाद संपुष्टात यावा यासाठी बार कौन्सिलकडूनही प्रयत्न सुरु होते. मंगळवारी या प्रयत्नांना काही अंशी यश आल्याचे दिसते.

मंगळवारी दुपारी दीपक मिश्रा यांनी न्या. चेलमेश्वर, न्या. गोगोई, न्या. लोकूर आणि न्या. जोसेफ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दीपक मिश्रा हे उद्यादेखील (बुधवारी) चारही न्यायाधीशांची भेट घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

तत्पूर्वी, वेणुगोपाल यांनी या वादावर पुन्हा प्रतिक्रिया दिली होती. अद्याप हा वाद मिटलेला नाही. आगामी २ ते ३ दिवसांत वादावर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सरन्यायाधीश किंवा चार न्यायाधीशांशी अद्याप चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. वेणुगोपाल यांच्या विधानानंतर सरन्यायाधीशांनी ही भेट घेतल्याने लवकरच वादावर पडदा पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.