सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग मांडण्यासाठी विरोधी पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचूरी यांनी महाभियोग मांडता येईल का याबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधला आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टातील न्या. चेलमेश्वर, न्या. कुरिअन जोसेफ, न्या. मदन लोकूर आणि न्या. रंजन गोगोई या चार न्यायमूर्तीनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामकाजावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. सरन्यायाधीशांचा कारभार मनमानी असतो, असा त्यांचा आरोप होता. या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थाच हादरली होती. देशभरात या पत्रकार परिषदेमुळे खळबळ उडाली. दीपक मिश्रा यांनी चारही न्यायाधीशांची भेट घेत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आता विरोधी पक्षही दीपक मिश्रांविरोधात सक्रीय झाले आहेत.

‘सरन्यायाधीशांविरुद्ध अधिवेशनात महाभियोग ठराव मांडता येईल का, याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी अन्य विरोधी पक्षांशी संपर्क साधणार, अशी माहिती माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली. ‘न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे आहे. आता या प्रकरणात (दीपक मिश्रांविरोधात चार न्यायाधीशांनी केलेली तक्रार) संसदच तोडगा काढू शकते आणि यासाठी महाभियोगचा पर्याय समोर आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसही महाभियोगसाठी अनुकूल असल्याचे समजते. ‘सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांमधील वाद हा गंभीर प्रकार आहे. आमचे नेते या आठवड्याच्या शेवटी एक बैठक घेतील आणि महाभियोगला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत विरोधकांकडे बहुमत असल्याने तिथेच महाभियोगाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला जाईल, असे सांगितले जाते.