एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

पालकांवर हल्ला होत असताना मुलांनी जर त्याचा प्रतिकार केला तर तर तो योग्यच आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पालकांना मारहाण करणाऱ्या शेजाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी दोन भावांची सर्वोच्च न्यायालयाने मुक्तता करताना हे स्पष्ट केले. या घटनेत या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

वडिलांवर हल्ला होत असताना, बळाचा वापर करणे कायदेशीररीत्या योग्य आहे, असे न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि शिवा कीर्ती सिंह यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने दोन भावांची दोन वर्षांची शिक्षा रद्दबातल ठरवली. राजस्थान उच्च न्यायालयाने या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवला होता. त्यांनी या निर्णयाला  आव्हान दिले होते. शेजाऱ्यांनी आपल्या वडिलांवर केलेल्या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच आई जखमी झाल्याचे डॉक्टरांच्या मदतीने निदर्शनास आणून दिले होते.  या घटनेत नेमके कोण आक्रमक होते हे सांगता येणार नाही. तसेच बचाव पक्षाकडून झालेल्या मारहाणीत आरोपींच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा देता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्यांच्या पालकांना मारहाण का झाली याचे योग्य स्पष्टीकरणही दिलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.