सोमवारी दिवसभर झालेल्या वेगवान घडामोडींमध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना अंशत: दिलासा मिळाला. आपल्याला तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवण्यात यावे असा प्रस्ताव चिदम्बरम यांनी दिल्यानंतर, आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना तिहार कारागृहात पाठवले जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

चिदम्बरम यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी केलेल्या विनंतीवर आजच निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने दुपारी १.४० वाजताच्या सुमारास सांगितले. त्यांना हा दिलासा न मिळाल्यास त्यांची सीबीआय कोठडी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मात्र न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर काही तासांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास न्यायालयापुढे या प्रकरणाचा उल्लेख केला आणि या आदेशाच्या अंमलबजावणीत ‘कार्यकक्षेबाबतची अडचण’ उद्भवेल असे सांगितले.

मेहता यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. आर. भानुमती व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात दुरुस्ती केली आणि आपल्यविरुद्धच्या अजामीनपात्र वॉरंटला, तसेच कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पारित केलेल्या कोठडीबाबतच्या आदेशांना आव्हान देणाऱ्या चिदम्बरम यांच्या याचिकेची सुनावणी गुरुवारऐवजी मंगळवारी निश्चित केली.

आपल्या हिशेबानुसार, चिदम्बरम यांच्या कोठडीची १५ दिवसांची मुदत मंगळवारी किंवा जास्तीत जास्त बुधवारी संपेल आणि सीबीआय त्यांची आणखी तीन दिवसांची कोठडी घेऊ शकणार नाही, असे मेहता यांनी निदर्शनास आणून दिले. या युक्तिवादाची दखल घेऊन, चिदम्बरम यांची कोठडी एक दिवसांनी वाढवून घेण्यासाठी सीबीआय कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकते, असे खंडपीठाने सांगितले.

यापूर्वी सकाळच्या सत्रात चिदंबरम यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी आपल्या अशिलाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यावर प्रश्नचिन्ह लावले आणि चिदम्बरम आधीच गेल्या १२ दिवसांपासून सीबीआयच्या कोठडीत असल्याचे सांगितले. एकतर त्यांना अंतरिम जामीन द्यावा, किंवा त्यांना नजरकैदेत ठेवावे. त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात येऊ नये. ते ७३ वर्षांचे आहेत, असे सिबल यांनी खंडपीठाला सांगितले.

सीबीआय कोठडीत १ दिवसाची वाढ

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना सुनावण्यात आलेल्या सीबीआय कोठडीची मुदत दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी एक दिवसाने वाढवली. चिदम्बरम यांनी या प्रकरणात अंतरिम जामिनासाठी केलेल्या अर्जाची विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार मंगळवारी सुनावणी करणार आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदम्बरम यांना ३० ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या ३ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी चिदम्बरम यांना काही दिलासा देण्यास विरोध करताना सीबीआयने त्यांची कोठडी आणखी एक दिवसाने वाढवून देण्याची विनंती केली.

२१ ऑगस्टच्या रात्री अटक करण्यात आलेले चिदम्बरम यांचा अंतरिम जामीन मागणारा अर्ज ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी न्यायालयात सादर केला. त्यांच्या या अर्जाला उत्तर देण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वेळ मागितला आणि वैधानिक आवश्यकता म्हणून सीबीआयला नोटीस जारी करण्यात यावी अशी मागणी केली.

सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जायला हवी आणि प्रत्येक नागरिकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य समान आहे, याचा मेहता यांनी उल्लेख केला. जामीन अर्जाला उत्तर देण्याकरता सीबीआयला वेळ न देण्यात आल्यास ती न्यायाची गंभीर थट्टा ठरेल असे सांगून त्यांनी १० दिवसांच्या मुदतीची मागणी केली.