सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका फेटाळली आहे. या अगोदर राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत मुकेशने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची याचिका फेटाळल्याने आता मुकेशला फाशी निश्चित आहे.

राष्ट्रपतींनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही. मुकेशला कारागृहात चुकीची वागणूक मिळाली हा दयेचा आधार होऊ शकत नाही. दया याचिकेवर लगेच निर्णय दिला याचा अर्थ योग्यरित्या निर्णय घेतला गेला नाही, असा होत नसल्याचही न्यायालयानं स्पष्ट केलं.

मुकेशच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.राष्ट्रपतींकडे सर्व कागदपत्र सादर करण्यात आली नव्हती, दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशच्या वकीलांकडून करण्यात आला होता. तर, निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीसाठी सत्र न्यायालयाने कोणती तारीख निश्चित केली आहे? डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का? असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने तिहार कारागृहास उद्देशून केले आहेत. यावर कारागृह प्रशासनाच्यावतीने आता उत्तर दिले जाणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी तिहार तुरुंगात तयारी सुरु करण्यात आली आहे. शनिवार, १ फेब्रुवारी २०२० रोजी या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या चौघांकडे त्यांची शेवटची इच्छा विचारली आहे.

यापूर्वी चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करुन २२ जानेवारी ही फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, आरोपींची काही प्रकरणं प्रलंबित राहिल्याने नव्याने डेथ वॉरंट काढण्यात आले आणि १ फेब्रुवारी २०२० ही फाशीची ताऱीख निश्चत करण्यात आली. दरम्यान, तिहार तुरुंगात ही फाशी दिली जाणार असल्याने त्यासंबंधीची पूर्वतयारी करण्यात येत आहे.