मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार व दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
न्यायालयाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मेमनच्या फाशीला हंगामी स्थगिती दिली होती. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्याची शिक्षेसंदर्भात करण्यात आलेली पुनर्विचार याचिका फेटाळली.
१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांचा बळी गेला होता. तर ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. याकुबने दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे तसेच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याला १९९४ मध्ये काठमांडू येथे अटक करण्यात आली होती. टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही टाडा न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. हा सर्व कट अंमलात आणण्यासाठी याकूब मेमनचाच हात असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. व्यवसायाने चार्टड अकाउंटट असणारा याकुब हा या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार आणि फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ आहे.