२०० कोटी जमा केल्याने सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये २८ नोव्हेंबरमध्ये वाढ केली असून नोव्हेंबर अखेरपर्यंत आणखी २०० कोटी रुपये जमा करण्याचे आश्वासनही रॉय यांनी कोर्टात दिले आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना अटक झाली होती. सध्या सुब्रतो रॉय हे सध्या पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेर आहेत. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुब्रतो रॉय यांच्या पॅरोल अर्जावर सुनावणी झाली. सुब्रतो रॉय यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सहारा यांच्यावतीने विजय मल्ल्यांचा दाखला देण्यात आला. बँकांचे हजारो कोटी रुपये थकवणारे आज देशाबाहेर आहेत. पण मी मात्र १० हजार कोटी रुपये भरले आहेत असे सुब्रतो रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सुब्रतो रॉय यांच्याबाबत योग्य विचार व्हावा अशी विनंतीही सुप्रीम कोर्टाला करण्यात आली.

दरमहिन्याला २०० ते ३०० कोटी रुपये भरुन कमी कालावधीसाठी सुटका करुन घेण्याऐवजी वर्ष ते दीड वर्ष तुरुंगाबाहेर राहून मी सर्व पैसे परत करीन असे सिब्बल यांनी कोर्टात सांगितले. मी तुम्हाला पैसे परत करण्यासाठी एक आराखडाच सादर करतो. मला पैसे भरायला फक्त एक ते दीड वर्ष द्या असा युक्तीवाद रॉय यांच्या वकिलांनी केला. मला माहिती आहे मला पैसे भरावेच लागतील, पण ते पैसे माझ्या पद्धतीने भरु द्यावेत, माझी संपत्ती माझ्यापद्धतीने विकू द्यावीत अशी विनंती सिब्बल यांनी कोर्टाला केली. सुब्रतो रॉय यांनी परदेशातील दोन हॉटेल विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आले अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.  शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात सहारा यांनी २०० कोटी रुपये भरले. तसेच आणखी २०० कोटी रुपये नोव्हेंबरपर्यंत भरु असे आश्वासन दिले.