राममंदिर बाबरी मशीद वाद हा अग्रक्रमाचा विषय नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने हिंदूंचा अपमान केला आहे, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली आहे. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी जोशींनी संवाद साधला. “मंदिराच्या उभारणीसाठी कायद्याची परवानगी आवश्यक आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी होणार होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी खूशखबर मिळेल अशी हिंदूंना अपेक्षा होती,” जोशी म्हणाले.

परंतु सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली व हा विषय अग्रक्रमाचा नसल्याचे स्पष्ट केले. जानेवारीमध्ये उचित खंडपीठापुढे या याचिका सादर होतील व सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचा दाखला देत जोशी म्हणाले की हिंदूंच्या भावनांशी अत्यंत जवळचा असा असणारा हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अग्रक्रमात नसणे हे क्लेषदायी आहे. त्यामुळे आपला अपमान झाल्याची हिंदूंची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही सरकारवर दबाव टाकत नसल्याचेही जोशी म्हणाले. कायदा व घटना यांचा आम्ही आदर करतो, म्हणूनच इतका विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा या मागणीसंदर्भात विचारणा केली असता, जोपर्यंत जागेच्या मालकिसंदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणे सरकारला शक्य नसल्याचे जोशी म्हणाले.

संघाने हिंदुत्वाचे धडे माझ्याकडून घ्यावेत, असे राहुल गांधींनी म्हटले होते. याचाही भय्याजी जोशी यांनी समाचार घेतला. राहुल गांधी यांना किती गांभीर्याने घ्यावे, याचा आपण विचार केला पाहिजे असे म्हणत त्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. जम्मू- काश्मीरमध्ये केंद्र सरकारने उचललेल्या कठोर पावलामुळे काही समाजकंटक चि़डले आहेत, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. गेल्या वर्षभरात संघाने देशभरात १३ लाख वृक्षारोपण केले, असा दावाही त्यांनी केला.