ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. दरम्यान २० ऑगस्ट रोजी न्यायालयात शिक्षेवर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होतं. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

प्रशांत भूषण यांची बाजू
प्रशांत भूषण यांनी नोटीशीला उत्तर देताना मतांची अभिव्यक्ती कितीही स्पष्ट, मान्य न होण्यासारखी आणि काहीजणांसाठी अप्रिय अशी असली, तरी त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही असं उत्तर दिलं होतं. तसंच आपलं ट्विट न्यायाधीशांच्या वैयक्तिक वागण्यावर असून यामध्ये न्यायव्यवस्थेवर बोट ठेवण्यात आलं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं होतं. प्रशांत भूषण यांनी नोटीशीला उत्तर देत आपली बाजू मांडल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

ट्विटरला विचारणा
सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांच्यासह ट्विटर कंपनीलाही आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं होतं. ट्विटरने भूषण यांचे दोन ट्वीट काढून का टाकले नाहीत, अशी विचारणा बुधवारी केली. त्यावर, न्यायालयाने आदेश दिला तर हे ट्वीट काढून टाकले जातील मात्र स्वत:हून ट्विटर ते काढून टाकू शकत नाही, असे ट्विटरकडून न्यायालयात सांगण्यात आलं होतं.