बँकांचे कर्ज बुडवून परदेशी पळून गेलेला किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्याला Vijay Mallya सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला दोषी ठरवण्यात आले आहे. विजय मल्ल्याने संपत्तीची पूर्ण माहिती न दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. १० जुलैपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश विजय मल्ल्याला देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय १० जुलैला विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा अवमान आणि डिएगो व्यवहारातून मिळालेल्या ४० मिलीयन यूएस डॉलरबद्दल निकाल राखून ठेवत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी म्हटले होते. मल्ल्याला डिएगो करारातून मिळालेले ४० मिलीयन डॉलर सर्वोच्च न्यायालयाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकारला मदत होणार आहे.

‘न्यायालयाला संपत्तीविषयी दिलेली माहिती योग्य आहे का ? कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन तर केलेले नाही ना ?,’ असे प्रश्न सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले. कर्नाटक उच्च न्यायालयाने मल्ल्याला आदेशाशिवाय व्यवहार न करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी मल्ल्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

‘विजय मल्ल्याने ९ हजार २०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही,’ असे स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ‘मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी केली जाऊ नये. कारण मल्ल्या वारंवार न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करतो,’ असे बँकांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ‘९ हजार २०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत. माझी सर्व संपत्ती आधीच जप्त करण्यात आली आहे,’ असे मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.