हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला व त्यांचा मुलगा अजयसिंह चौताला तसेच इतर तिघांना शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. त्यांच्या याचिकेच्या सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यू. यू. ललित यांनी माघार घेतली आहे. या घोटाळ्यातील काही आरोपींची बाजू आपण न्यायालयात मांडली आहे त्यामुळे आपण माघार घेत आहोत, असे ललित यांनी सांगितले. न्या. एफ. एम. आय. कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पीठात ललित यांचा समावेश होता. यापूर्वीही ललित यांनी चौताला यांच्या मुलाच्या याचिकेवरील सुनावणीतून माघार घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींनी शिक्षेला दिलेल्या आव्हानाची सुनावणी २१ जुलैला ठेवली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने चौताला व त्यांचा मुलगा तसेच इतर तिघांना देण्यात आलेली दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ५ मार्च रोजी कायम केली होती. चौताला व इतर ५३ जणांना १६ जानेवारी २०१३ रोजी कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यात दोन आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हरयाणात इ.स. २००० मध्ये शिक्षक भरती घोटाळा झाला होता. त्यात ३२०६ शिक्षकांची बेकायदा भरती करण्यात आली होती. यात ५५ जणांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवण्यात आले होते.