News Flash

शर्ट न घालताच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहिला वकील; न्यायमुर्ती म्हणाले…

सोमवारी एका महत्वपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान घडला प्रकार

प्रातिनिधिक फोटो

सुदर्शन टीव्ही प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना सोमवारी धक्काच बसला जेव्हा एक वकील शर्ट न घालताच व्हिडीओ कॉलवरुन होणाऱ्या सुनवणीसाठी उपस्थित राहिला. या खटल्यासंदर्भातील सुनावणी सुरु झाल्यानंतर काही क्षणांमध्येच मोठ्या स्क्रीनवर न्यायाधिशांना शर्ट न घातलेल्या अवस्थेतील व्यक्ती दिसली. या संदर्भात न्या. डी. व्हाय. चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने आक्षेप घेत ही व्यक्ती कोण होती यासंदर्भात विचारणा केली. एखाद्या वर्गामध्ये शिक्षकांनी विचारावे त्याप्रमाणे न्यायमुर्तींनी तीन चार वेळा यासंदर्भात विचारणा करुनही कोणीच उत्तर दिलं नाही. झालेला गोंधळ पाहून वकिलाने लॉग आऊट केल्याने यावर कोणी उत्तर दिलं नसल्याचं समजते.

खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे लाइव्ह लॉ इन या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. “कोणीतरी या सुनावणीसाठी शर्ट न घालताच उपस्थित राहिलं होतं. यासंदर्भात काही ठोस नियम हवेत,” असं न्या. चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. घडलेला प्रकार खूपच वाईट होता असं खंडपीठातील सदस्य असणाऱ्या न्या. इंदू मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

“ही घटना अक्षम्य आहे,” असं मत सॉलिसिटर जनरल असणाऱ्या मेहता यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना व्यक्त केलं. या प्रकरणासंदर्भात संबंधित वकीलाशी बोलून अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना कराव्यात असं न्या. चंद्रचूड यांनी मेहता यांना सांगितलं. ओपइंडियाची बाजू मांडणाऱ्या वकीलांकडून ही चूक झाल्याचे लाइव्ह लॉ इनने म्हटलं आहे.

सध्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉलवरुन होत असली तरी असे प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमानच आहे. या व्हिडीओवरुन होणाऱ्या सुनावण्या या इतर सुनावण्यांप्रमाणेच असून वकिलांनी यासंदर्भात जास्त दक्ष राहणं गरजेचं आहे. अशा घटनांसंदर्भात कारवाई करण्याची आपली इच्छा नाही. मात्र सुनावणीला येताना वकिलांनी आपण न्यायाधिशांसमोर जाणार आहोत याचं भान ठेवलं पाहिजे असंही न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

काही आठवड्यांपूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉलवरील सुनावणीदरम्यान धुम्रपान केल्याप्रकरणी एका वकिलाला दंड ठोठावला होता. तर त्यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी बनियानमध्ये उपस्थित राहणाऱ्या वकिलाला फटकारलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 9:45 am

Web Title: supreme court judges shocked to see advocate shirtless during vc hearing scsg 91
Next Stories
1 …म्हणून २७ वर्षीय तरुणीने प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला
2 आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याचा यु-टर्न, म्हणाले…
3 “राज्यात अल-कायदा पाय पसरतोय, प्रत्येक कार्यक्रमात होतोय बॉम्बचा वापर”
Just Now!
X