सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ‘‘आपले सर्वाधिक लोकप्रिय, आवडते, चैतन्यमूर्ती आणि द्रष्टे नेते’’, अशा शब्दांत न्यायमूर्ती शहा यांनी मोदी यांचे वर्णन केले.
गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सव सोहळ्यात न्यायमूर्ती शहा म्हणाले की आपले सर्वाधिक लोकप्रिय, आवडते, चैतन्यमूर्ती आणि द्रष्टे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवात सहभागी होणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आणि सन्मानदायक आहे. संसद, प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यात झालेले सत्तेचे विभाजन हे भारतीय संविधानानुसार स्थापन झालेल्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे, असेही न्यायमूर्ती शहा म्हणाले. न्यायमूर्ती शहा गुजरात उच्च न्यायालयाची प्रशंसा करताना म्हणाले, गुजरात उच्च न्यायालयाने कधीच ‘लक्ष्मणरेषा’ (सत्तेची मर्यादा आणि आचारसंहिता) ओलांडली नाही आणि नेहमी न्याय केला.
गुजरात उच्च न्यायालय ही आपली कर्मभूमी होती. आपण तेथे २२ वर्षे वकिली केली आणि १४ वर्षे न्यायाधीश म्हणून काम केले, असेही न्यायमूर्ती शहा म्हणाले. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनीही, ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे द्रष्टे नेते’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली होती. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. न्यायमूर्ती मिश्रा आता सेवानिवृत्त झाले आहेत.
आपले सर्वाधिक लोकप्रिय, आवडते, चैतन्यमूर्ती आणि द्रष्टे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवात सहभागी होणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. – न्यायमूर्ती एम. आर. शहा, सर्वोच्च न्यायालय
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2021 2:59 am