News Flash

लग्नाचा खर्च जाहीर करण्याची सक्ती करा – सर्वोच्च न्यायालय

पैशांची उधळपट्टी करत थाटामाटात लग्न करण्यावर सर्वोच्च न्यायालय बंधन आणण्याची शक्यता आहे

पैशांची उधळपट्टी करत थाटामाटात लग्न करण्यावर सर्वोच्च न्यायालय बंधन आणण्याची शक्यता आहे. लग्नाचा खर्च जाहीर करणं अनिवार्य करण्यावर विचार करा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं आहे. दोन्ही कुटुंबांना लग्नाच्या खर्चाची माहिती विवाह कार्यालयात देता येईल असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. याची अंमलबजावणी करायची असेल तर केंद्र सरकारने कायदा तयार करण्यासंबंधी विचार केला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

यामुळे हुंडा प्रथेला आळा बसेल तसंच सामाजिक दबाबाखाली करण्यात येणाऱ्या खर्चाचाही तपशील मिळेल असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला आहे. याशिवाय हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग करत दाखल होणाऱ्या खोट्या प्रकरणांचाही उलगडा होईल असं न्यायालयाने म्हटलं आहे. याशिवाय भविष्यातील गरजा पूर्ण कऱण्यासाठी लग्नाच्या खर्चातील काही पैसे वधूच्या खात्यात टाकता येईल का ? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवत आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालय एका खटल्यावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने ही विचारणा केली आहे. एका महिलेने आपला पती आणि सासरच्यांविरोधात हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. पतीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

अशा प्रकरणांमध्ये अनेकदा हुंडा ही एक समान गोष्ट असते, सोबतच लग्नात होणाऱ्या खर्चावरुनही वाद होत असतात त्यामुळेच न्यायलयाने खर्चाचा तपशील देणं अनिवार्य करण्यासंबंधी विचारणा केली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये लोकसभेत लग्नाच्या खर्चासंबंधी एक विधेयक सादर करण्यात आलं होतं. यामध्ये लग्नाचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास १० टक्के कर लावण्यासंबंधी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:27 pm

Web Title: supreme court making compulsory to declare marriage expenditure
Next Stories
1 हिंदू पाकिस्तानच्या वादाबाबत शशी थरूर म्हणतात ‘कुछ तो लोग कहेंगे!’
2 चोरी केल्याचा पश्चात्ताप, दागिने परत करत मागितली माफी
3 ‘हिंदुत्त्वाचा अतिरेक देशासाठी घातक’
Just Now!
X