दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल का, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र आणि गुजरातच्या राज्य सरकारकडे उत्तर मागितले आहे.

गुजरातमधील एका विद्यार्थ्यांने नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी त्याला अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे आहे. मात्र, डॉक्टर होण्यासाठी असे प्रमाणपत्र देण्यास नकार मिळाल्याने या विद्यार्थ्यांने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि दीपक मिश्रा यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर विद्यार्थ्यांला दृष्टिदोष आहे. तो नीट पाहू शकत नाही. आणि हे व्यंग बरेही होऊ शकणार नसल्याने या विद्यार्थ्यांला डॉक्टर होण्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल का, आणि भविष्यात डॉक्टर बनल्यास तो रुग्णांवर उपचार करू शकेल का, असे प्रश्न न्यायालयाला पडले आहेत. यावर खंडपीठाने केंद्र आणि गुजरात राज्य सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. शिक्षक किंवा कायदे क्षेत्रात अंध विद्यार्थ्यांला जायचे असल्यास तो त्या क्षेत्रात यशस्वीपणे वावरू शकतो. मात्र, वैद्यकीय क्षेत्रासाठी असा व्यक्ती योग्य ठरेल का, याबाबत विचार करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.