सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्यांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले. मल्ल्या यांनी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या संपत्तीचा खरा तपशील जाहीर करावा, असे न्यायालयाने सांगितले. याशिवाय , न्यायालयाने मल्ल्यांचा वकिलांना मल्ल्या भारतात कधी परतणार, याबद्दलची माहिती देण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, आजच्या सुनावणीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समुहाने विजय मल्ल्या यांचा कर्जफेडीचा प्रस्ताव नाकारला. मल्ल्या यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकडून घेतलेल्या कर्जापैकी चार हजार कोटी रूपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव गेल्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला होता. मात्र, बँक समुहाच्या माहितीनुसार मल्ल्या यांनी १७ बँकांकडून घेतलेल्या एकत्रित कर्जाची रक्कम ९००० कोटी इतकी आहे. मल्ल्या यांनी त्यापैकी ४००० कोटींचे कर्ज येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासाठी मल्ल्या यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी, असा आग्रह धरत बँकांनी मल्ल्याचा प्रस्ताव नाकारला. याशिवाय, मल्ल्या यांना त्यांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीसह स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही बँकांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कुरियन जोसेफ आणि एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने बँकांची मागणी मान्य करत मल्ल्यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.