नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास परवानगी नाकारण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या भाजपच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

‘लोकशाही बचाव यात्रा’ काढण्यासाठी पश्चिम बंगाल प्रदेश भाजपने परवानगी मागितली होती. सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ४२ लोकसभा मतदारसंघांतून ही यात्रा काढण्यात येणार होती. परंतु कोलकाता उच्च न्यायालयाने यात्रा काढण्यास परवानगी नाकारल्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. शांततेने यात्रा काढण्याचा आपला मूलभूत अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे भाजपने या याचिकेत नमूद केले आहे.

यात्रेला परवानगी देणाऱ्या एकसदस्यीय पीठाचा आदेश फिरवून कोलकाता उच्च न्यायालयाने २१ डिसेंबरला परवानगी नाकारण्याबाबतचा आदेश दिला. या आदेशाच्या अंमलबजावणीला एकतर्फी स्थगिती देऊन आपल्याला तात्पुरता दिलासा द्यावा, असेही भाजपने याचिकेत म्हटले आहे.

केवळ शंका आणि अनुमानाच्या आधारावर, एखाद्या पक्षाच्या शांततेने यात्रा काढण्याच्या हक्कावर गदा आणता येत नाही. पश्चिम बंगाल सरकार वारंवार तसे करत आले आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर वारंवार हल्ले करत असल्याने, अनेक संस्थांनी कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याच्या सरकारच्या कृतीला आव्हान दिले होते. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगीही दिली होती, असेही याचिकेत नमूद केले आहे.

भाजपला त्रास देण्यासाठी यापूर्वीही अनेकदा अखेरच्या क्षणी कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु त्याविरोधात पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या राजकीय वैराला भाजप २०१४ पासून तोंड देत आहे, असाही उल्लेख याचिकेत आहे.

अ‍ॅड. ई. सी. अगरवाला यांच्यामार्फत सादर केलेल्या या याचिकेत पश्चिम बंगाल सरकार, मुख्य सचिव, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

रथयात्रा कशासाठी?

निवड स्वातंत्र्याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे आणि त्यांना अधिक माहिती देणे हा यात्रा काढण्यामागील उद्देश असल्याचे भाजपने याचिकेत नमूद केले आहे. तीन जिल्ह्य़ांमधून ही यात्रा काढण्याचा पक्षाचा विचार आहे.

भाजप कार्यकर्ते –  पोलीस चकमक

भाजपने पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्य़ातील बसिरहाट शहरात आयोजित केलेल्या ‘कायदेभंग कार्यक्रमाला’ हिंसक वळण लागून भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी भाजप समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. पक्षाशी काहीही संबंध नसलेल्या ‘बाहेरच्या लोकांनी’ ही दगडफेक केल्याचा आरोप घटनास्थळी हजर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. आम्ही कायदेभंग आंदोलन शांततेने करत होतो, मात्र पोलिसांनी निष्कारण लाठीमार केला असे ते म्हणाले.