11 December 2017

News Flash

दिल्लीतील फटाकेविक्रेत्यांना दिलासा नाहीच, फटाके विक्रीवर बंदी कायम

प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

Updated: October 13, 2017 2:03 PM

सुप्रीम कोर्ट

दिल्लीतील फटाके विक्रेत्यांना शुक्रवारीही सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. फटाके विक्रीवरील बंदी हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. तर दुसरीकडे पंजाब हरयाणा हायकोर्टाने संध्याकाळी ६.३० ते ९.३० या वेळेतच फटाके फोडता येतील असे सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोर्टाने हा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे देशभरात पडसाद उमटले होते. अनेकांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तर पर्यावरण प्रेमींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत केले होते.

दिल्लीतील फटाके विक्रेत्यांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत आदेशात कोणतेही बदल करण्यास नकार दिला. या निर्णयाला धार्मिक रंग देऊ नका, असे कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे फटाके विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. आम्ही २८ टक्के जीएसटी भरुन फटाके विकत घेतले, मात्र आता आम्ही विक्री करु शकत नसल्याने नुकसान झाल्याची प्रतिक्रिया फटाके विक्रेत्यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णयापाठोपाठ पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानेही महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संध्याकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेतच फटाके फोडता येतील असे हायकोर्टाने म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन होत आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांच्या पीसीआर व्हॅनने गस्त घालावी असे निर्देश हायकोर्टाने दिले.

First Published on October 13, 2017 1:47 pm

Web Title: supreme court refused to modify its order suspending licence for sale of firecrackers in delhi ncr ahead of diwali