सुरत येथील बलात्कार प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला आह़े  त्याच वेळी राजस्थानातील जोधपूर येथील बलात्कार प्रकरणात मात्र त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास परवानगी देण्यात आली आह़े  न्या़  टी़  एस़  ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुरत येथील प्रकरणातील अर्ज फेटाळून लावताना याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत़
सुरत येथील मुलीने केलेल्या तक्रारीवरून आसाराम यांच्यासह त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार अनुयायांविरोधात खटला चालविण्यात येत आह़े  अहमदाबादमधील आसाराम आश्रमात राहत असताना १९९७ ते २००६ या कालावधीत आसाराम यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आह़े
दरम्यान, जोधपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली असून आसाराम यांना जामीन देण्याबाबत सरकारचे मत नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़  तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात ठेवण्यात आली आह़े  या प्रकरणातील मुलगी घटनेच्या वेळी अज्ञान नव्हती हे सिद्ध करणारे पुरावे मांडण्यासही न्यायालयाने आसाराम यांना परवानगी दिली आह़े मुलगी शाळेत शिकत असताना तिच्यावर आसाराम यांनी बलात्कार केल्याची तक्रार राजस्थानातील संबंधित मुलीच्या पित्याने केली आह़े