भीमा कोरेगाव येथील एल्गार परिषद प्रकरणात आरोपी असलेल्या वकील व कार्यकर्त्यां सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी केलेली याचिका विचारात घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे.

न्या. उदय लळित व अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीसाठी आली. भारद्वाज या गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असून, या प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, असे त्यांच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी या वेळी सांगितले.

त्यांच्याजवळून काहीही जप्त करण्यात आलेले नाही किंवा त्यांच्याजवळ काही आक्षेपार्ह साहित्यही सापडले नाही असा दावा त्यांनी केला. भारद्वाज यांना मधुमेहासह इतरही आजार असल्याचे त्यांनी सांगितले.भारद्वाज यांची जामीन याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, याची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. ‘तुम्हाला गुणवत्तेच्या आधारे हा खटला लढवता येईल. तुम्ही नियमित जामिनासाठी अर्ज का करत नाही’, अशी विचारणा खंडपीठाने केली. एकतर तुम्ही याचिका मागे घ्या, किंवा आम्ही ती फेटाळून लावू असे न्यायालयाने सांगितले. तेव्हा भारद्वाज यांच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली.